थर्टी फर्स्टच्या जल्लोषाच्या नावाखाली आजची तरुण पिढी कोणत्या मार्गाला चालली आहे, याचा गंभीर विचार करायला लावणारा आणि तरुणांच्या डोळ्यात अंजन घालणारा सामाजिक उपक्रम आज बिलोली येथे पार पडला. दारू, नशा आणि बेफिकीरी याला नकार देत द “दारूचा नव्हे तर द दुधाचा” हा सशक्त व सकारात्मक संदेश देणारा दूध वाटपाचा व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रम आज सायंकाळी तहसील कार्यालय समोर मोठ्या उत्साहात व शांततेत संपन्न झाला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बिलोली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे थर्टी फर्स्टच्या रात्री दारूच्या नशेत हरवणाऱ्या तरुणाईला आत्मपरीक्षण करायला भाग पाडणे हा होता. दारूच्या बाटलीऐवजी हातात दूध देत आयोजकांनी तरुणांसमोर आरोग्य, विवेक आणि सामाजिक जबाबदारीचा आरसा उभा केला.
या वेळी उपस्थित मान्यवरांना तरुणांना कमलाकर जमदडे यांनी संबोधित करताना सांगितले की,
क्षणिक मजेसाठी स्वतःचे आरोग्य, कुटुंबाचे स्वप्न आणि समाजाचे भविष्य धोक्यात घालणे ही प्रगती नाही.
खरी आधुनिकता ही व्यसनात नसून विचारात, संयमात आणि सामाजिक जाणिवेत आहे, असे भावनिक आवाहन करण्यात आले.
विशेष म्हणजे, मागील 11 वर्षांपासून बिलोली शहरात हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून, दरवर्षी हा कार्यक्रम केवळ एक औपचारिकता न राहता तरुणाईला अंतर्मुख करणारी सामाजिक चळवळ ठरत आहे. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाप्रमुख सचिव कमलाकर जमदडे यांच्यासह अनेक तरुणांनी स्वतःहून दूध स्वीकारत “दारूला नाही” असा मौन पण ठाम संदेश दिला.
या कार्यक्रमास
पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी, नायप तहसीलदार दीपक मरळे, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष अनुदत्त रायकंठवाड
यांची उपस्थिती लाभली.
आयोजक कमलाकर जमदडे, सायलू कारमोड, मोहन जाधव, बालाजी एल्गंदरे, भीमराव बडूरकर, गौतम भालेराव यांच्या वतीने असे आवाहन करण्यात आले की,
थर्टी फर्स्ट हा नशेचा नव्हे तर नवसंकल्पाचा दिवस व्हावा;
द दारूचा नव्हे तर द दुधाचा,
अंधाराचा नव्हे तर विचारांचा,
उध्वस्ततेचा नव्हे तर उज्ज्वल भविष्याचा मार्ग तरुणाईने स्वीकारावा.
या उपक्रमाने सायंकाळी बिलोली शहरात शांत, सकारात्मक आणि विचारप्रवर्तक वातावरण निर्माण केले, अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
बिलोली : प्रतिनिधी



