सायंटिस्ट खोपडी – बेलपासून नोबेलपर्यंत

इतरांना सांगा.

डॉ. नितीन हांडे – आपला भाऊ – ‘सायंटिस्ट खोपडी’चा लेखक. पुढे त्याला लेखकच म्हणतो, कारण ज्यांना लेखकाची शैली अजुन माहीत नाही त्यांचा गोंधळ व्हायला नको.

दरवेळी त्याने पुस्तक भेट दिले की, मी त्यावर लिहायचे ठरवतो. यावेळी लिहायला घेतले तर लेखकाने प्रस्तावनेत आणि लेखांत सगळेच लिहीलेले आहे असे दिसले. ते तुम्ही वाचालच. म्हणून त्याहून वेगळे काही लिहीण्याचा प्रयत्न केला आहे.

पुस्तकातील सगळे कोट्स(उतारे, उद्धरणे) भारी आहेत. कंसातील, चौकटीतील मजकूरही भारी आहे.

शास्त्रज्ञांचे, समाजसुधारकांचे कोट्स(विचार) केवळ जयंती-पुण्यतिथीला वाचण्यासाठी नसतात. इतर पारायणे करण्यापेक्षा रोज चार वेगवेगळे सुविचार वाचायला हवेत आणि कृतीत आणण्याचा प्रयत्नही करायला हवा.

विवेकभाईंनी काढलेली रेखाटनेही चांगली आहेत. विषयाप्रमाणे चित्रांची रचना, खोली, दृष्टीकोन(view point) वेगवेगळे ठेवले आहेत. त्याचे नाव स्वामित्वहक्क पानावर असायला हवे होते.

पुस्तकातील बरीच वाक्ये, प्रसंग माझ्या आत्मचरित्रातून* चोरलेले आहेत असे वाटले; पण त्याचा खुलासा लेखकाने समारोपात केला आहे.

माझ्या आत्मचरित्रात* एक वाक्य आहे – ‘प्रस्थापित नियम मोडल्याशिवाय शोध लागत नाही.’ इथे सांगायचे कारण की, आपल्या देशातील लोक नियम मोडण्यात पटाईत असताना त्याप्रमाणात आपल्याकडे शास्त्रज्ञ का तयार होत नसावेत? माझ्या मते अज्ञाताची भीती हे एक कारण असावे. एरवी सिग्नलला न थांबणारे लोक मांजर आडवे गेल्यावर मात्र थांबतात.

‘जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन’ (जॅक म्हणजे – टेकू, किमान ज्ञान) बरेचदा हे वाक्य दुसऱ्याला बोलणारे स्वतः कशातले जॅकही नसतात. ‘जॅक’ होणे ही ‘मास्टर’ होण्याची पायरी असते. ‘जॅक ऑफ ऑल’ असणे आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगी असते. आपले शालेय शिक्षण आपल्याला ‘जॅक ऑफ ऑल’ बनवण्याचेच असते. मास्टर कशात व्हायचे हे आपण नंतर ठरवायचे असते.

लेखक सगळ्यां शास्त्रज्ञांना भाऊ म्हणतो आणि लेखक आपला भाऊ. भाऊचा भाऊ तो आपला भाऊ, त्यामुळे सगळे शास्त्रज्ञ आपले कुटुंबीयच. देश, धर्म, भाषा, लिंग यांचा उल्लेख फक्त माहितीसाठी असतो. त्याने काही फरक पडत नाही. अगदी त्यांची नावेही विसरलात तरी चालेल. आपल्याला त्यांचे कार्य, चिकटी, ध्यास, सातत्य अशा गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, ज्यातून आपल्याला प्ररणा मिळत राहील.

हे पुस्तक मुलांना द्याच पण शिक्षकांनी, पालकांनीही वाचा. सगळेच ‘सायंटिस्ट खोपडी’चे होणार नाहीत; पण जे होतात त्यांना आपण अडसर होत नाही इतका ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ आपल्यात असायला हवा.

‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ लोकांनी अंगिकारावा याबद्दलची लेखकाची तळमळ पानोपानी जाणवते. प्रस्तावना, लेखांचे शेवटचे परिच्छेद त्याची ठळक उदाहरणे आहेत. ते शेवटी पुन्हा एकदा सलग वाचण्यासारखे आहेत.

लेखकाची ‘पाथमेकर्स’ हे महिला शास्त्रज्ञ विशेष, ‘आपले भवताल’, ‘इस्रो-द प्राईड ऑफ इंडिया’ ही पुस्तकही आहेत. तसेच दैनिक पुण्यनगरीत दर गुरूवारी ‘सोप्प आहे की हे!’ हे सदरही चालू आहे. तेही वाचनीय आहे.

– मिनासो

* विशेष सूचना – माझे आत्मचरित्र अजून लिहायचे आहे.

पुस्तक : सायंटिस्ट खोपडी 
लेखक : डॉ . नितीन हांडे 
प्रकाशक : न्यु इरा पब्लिशिंग हाऊस
किंमत :- 300 रु /-
इतरांना सांगा.