’वटसावित्री ते वटधरित्री’ उपक्रमा अंतर्गत पेणमध्ये वृक्षारोपण; अंनिससह समविचारी महिला संघटनांचा पुढाकार
पेण: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) शाखा पेण यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत ‘वटसावित्री ते वटधरित्री’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पारंपारिक सणांना सामाजिक बांधिलकीची आणि पर्यावरण संरक्षणाची जोड देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत पेणमधील विविध समविचारी महिला संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या उपक्रमात ‘आई डे केअर संस्था’च्या स्वाती मोहिते, ‘रोटरी क्लब ऑफ ओरायन’च्या कृपा जोशी, ‘सरस्वती शिक्षण ट्रस्ट’च्या सुचित्रा म्हात्रे, ‘स्नेहबंध तनिष्का गट’च्या स्वाती गांधी आणि रायगडच्या आदिवासी प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांच्यासह अनेक सामाजिक क्षेत्रातील महिला पदाधिकार्यांनी एकत्र येत वृक्षलागवड केली. केवळ उपवास किंवा पूजा न करता धरित्रीला हिरवाईने नटवण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली.
याच उपक्रमात सावनी गोडबोले यांनी जोतिबाच्या आधुनिक सावित्रीसाठी नव्या विचारांच्या, वृक्षसंवर्धनाच्या व्रतासाठी ओव्या रचल्या होत्या. उपस्थित सर्व महिलांनी ओव्या गायल्या आणि वडाच्या झाडांभोवती फेर धरला. तसेच आई डे केअर च्या विध्यार्थ्यानी प्लास्टिक विषयी जनजागृतीसाठी एक नाटुकाले सादर केलें.
सावनी गोडबोले यांनी प्रस्तावानेत जुन्या रूढी परंपरांना नवीन पर्यावर्णस्नेही पर्याय देण्याची अंनिसची प्रबोधनाची भूमिका मांडली. प्राचार्य सतीश पोरे यांनी आज भारतात झाडें लावण्याची आणि ती जगाविण्याची निकड किती तीव्र आहे याची आकडेवारीसह जाणीव करून दिली.
संदेश गायकवाड यांनी अंधश्रद्धेकडून विज्ञानाकडे आणि पर्यावरण रक्षणाकडे जाणे हे समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे, हे सांगितले. तसेच आज सावित्रीच्या लेकींनी आगळा वेगळा उपक्रम राबवून समाजाला विशेष संदेश दिला ह्याबद्दल सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाला अं निस चे नंदकिशोर परब, राजरत्न लोखंडे, योगिता डंगर, जगदीश डंगर, विशाल चांदोरकर, मीना मोरे, सनय मोरे, एन जे पाटील, पाटील मॅडम, पोरे मॅडम तसेच नंदा गोखले, डॉ. श्रुती द्रविड, मोहिनी गोरे, गोरे सर, स्वाती शेलार, अस्मिता काळण, सुनिता म्हात्रे, असे समविचारी संघटनेचे अनेक कार्यकर्ते तसेच इतर नागरिक उपस्थित होते.



