वटपौर्णिमेनिमित्त वडाचे रोप लावून अनिसकडून निसर्ग संवर्धनाचा संदेश अंनिस,सातारा शाखेतर्फे
मंगळाई टेकडीवर अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी
सातारा | प्रतिनिधी
दिनांक २९ जून २०२६.
वटपौर्णिमा हा महिलांचा पारंपरिक श्रद्धेचा सण असला तरी या सणाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) सातारा शाखेने मंगळाई टेकडीवर वडाचे रोप लावून वटपौर्णिमा अनोख्या पद्धतीने साजरी केली. या उपक्रमातून वृक्षसंवर्धनाचा संदेश देत निसर्गाचे जतन हीच काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
सायंकाळी पाच वाजता आयोजित या उपक्रमात वडाच्या झाडाची पूजा करण्याऐवजी वडाचे रोप लावून त्याच्या संवर्धनाचा संकल्प करण्यात आला. वाढते शहरीकरण, रस्ते रुंदीकरण आणि विविध विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असून, त्याला समाजाने केवळ मूक साक्षीदार न राहता ठाम विरोध करण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
“निसर्ग टिकला तरच मानवजातीचे अस्तित्व टिकेल. भारतीय संस्कृतीतील ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हा संदेश केवळ म्हणण्यापुरता न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची आवश्यकता आहे,” असेही यावेळी सांगण्यात आले.
पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाबाबत जनजागृती व्हावी, तसेच प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन अनिसच्या कार्यकर्त्यांनी केले.
या उपक्रमात प्रकाश खटावकर, नगरसेवक रवी पवार यांच्यासह महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते संतोष भिलारकर,श्री व सौ. शशिकांत सुतार दिलीप महादार उदय चव्हाण श्री व सौ.भगवान रणदिवे, दशरथ रणदिवे, भरत लोकरे विजय पवार, वर्षा पवार , सुषमा खटावकर,सोनाली खटावकर, ज्योती मोहिते नलिनी पवार प्रमोदिनी मंडपे श्री आर बर्गे सुधाकर बर्गे, बी आर मानेसाहेब , कमलेश शिंदे, नाजीम इनामदार , शैलेंद्र पाटील, मोनाली शेळके, प्रा. दादासाहेब नवले प्रा. दत्ताजीराव जाधव, डॉक्टर नीता यादव, विकास तोडकर इत्यादी कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


