पूर्वी समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी होते. जसजसे शिक्षणाचे प्रमाण वाढेल तसतसे अंधश्रद्धा दूर होतील असे अनेक विचारवंतांना वाटत असे. आज समाजात शिक्षणाचे प्रमाण नक्कीच वाढले आहे पण सुशिक्षित लोकही भ्रामक विज्ञानाच्या नादी लागून अंधश्रद्धेपायी आपले नुकसान करून घेतात. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा’ या नावाने एक व्हिडिओ तयार केला होता. त्यात त्यांनी सुशिक्षित लोक अंधश्रद्धेला बळी पडण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांची अगतिकता असे प्रतिपादन केले होते. डॉक्टरांच्या म्हणण्याला पुष्टी देणारी एक घटना पुणे येथे नुकतीच उघडकीस आली.
संगणक अभियंता असलेला उच्चशिक्षित दीपक डोळस हा इंग्लंड मध्ये एका चांगल्या कंपनीत जॉब करत होता. तेथे त्याने स्वतःचे एक घर घेतले होते. पत्नी व दोन मुलींसह तो तेथे राहत होता. सर्व व्यवस्थित होते पण त्यांच्या समोर एक वेगळी समस्या उभी होती. डोळस दांपत्याची मोठी मुलगी मतिमंद होती तर धाकटी मुलगी कमी केस असण्याच्या एका विकाराने ग्रासली होती. दोन्ही मुलींवर अनेक वैद्यकीय उपचार केले पण वैद्यकीय उपचाराने हे विकार बरे होणार नाहीत असे त्यांना सांगण्यात आले. शेवटी मुलींचे संगोपन नीट व्हावे यासाठी त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पुण्यात येऊन कोथरूड भागात एक घर घेतले व एका चांगल्या कंपनीत नोकरी स्वीकारली.
डोळस दांपत्य एका भजनी मंडळात जात असे, तेथे त्यांची ओळख दीपक जनार्दन खडके या बाबाशी झाली. खडके यांनी डोळस यांच्याकडून त्यांच्या आर्थिक परिस्थितीची व त्यांच्या मुलींच्या असाध्य विकाराविषयी माहिती घेतली. खडके ने डोळस यांना सांगितले की वेदिका पंढरपूर ही माझी शिष्या असून ती शंकर महाराजांची लेक आहे. तिच्या अंगात शंकर महाराज येतात व ती तुमच्या सर्व समस्या दूर करेल, तुम्ही निश्चिंत रहा. यावर विश्वास ठेवून डोळस दांपत्याने वेदिका पंढरपूरे हिची भेट घेतली. वेदिका पंढरपूरे हिने त्यांच्या परिवाराची व त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती घेतली व समस्या नक्की दूर होतील असा विश्वास दिला. त्यांना खडके बाबांच्या दरबारात या असे सांगितले. तेथे वेदिका पंढरपूरे ही अंगात शंकर महाराज आल्याचा अभिनय करत असे. हिंदीमध्ये बोलून बाबा बोलत असल्याचे भासवत असे. तिने डोळस यांना तुम्ही तुमच्या नावावर काही रक्कम ठेवू नका, ती वेदिका यांच्या खात्यात जमा करा. तेथे ती रक्कम सुरक्षित राहील असे शंकर महाराजांच्या रूपात सांगितले. डोळस दांपत्याने तसे केले,तरीही मुलींच्या विकारात फरक पडला नाही. त्याचे कारण विचारल्यावर वेदिका ने तुमच्या मिळकतीत दोष आहे, तो मोठा आहे. त्यामुळे मुली बऱ्या व्हायला वेळ लागेल असे सांगितले. मिळकतीत दोष असल्यामुळे तुम्ही त्या विका आणि ती रक्कम आमच्याकडे द्या, असे सांगितले. मुली बऱ्या होतील या आशेने डोळस यांनी त्याप्रमाणे केले.तसेच मुलीच्या नावाने असलेली विमा पॉलिसी मोडून ती ही रक्कम वेदिका हिला दिली. इंग्लंड व कोथरूड येथील आपले स्वतःचे राहते घर विकून ती रक्कम वेदिका हिला देऊन ते भाड्याच्या घरात राहू लागले. एवढे करूनही मुली बऱ्या न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे डोळस दांपत्याच्या लक्षात आले. सुमारे 14 कोटी रुपये डोळस यांनी वेदिका व तिचा पती कुणाल यांना दिले होते.
यानंतर त्यांना काही मित्रांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. ठोंबरे पाटील यांनी सर्व गोष्टी नीट समजावून घेऊन त्यांना पोलिसात फिर्याद व न्यायालयात दावा दाखल करण्यास मदत केली. सर्व साक्षी पुरावे होऊन न्यायालयाने सर्व आरोपींना दोषी ठरवले आणि आपली मिळकत विकून डोळस यांचे पैसे परत करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही चालू आहे.
या सर्व प्रकरणात अॅड. ठोंबरे पाटील यांनी अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली. आरोपींना शिक्षा होण्याबरोबरच डोळस यांचे पैसे परत मिळाले पाहिजे हा माझा उद्देश होता असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या प्रकरणात कधीही काही मदत लागल्यास मी अनिस चा कार्यकर्ता म्हणून कायम तयार आहे, असे त्यांनी त्यांच्या भेटीत सांगितले.
अशा अंधश्रद्धांना बळी न पडल्यासच सुशिक्षित लोकांच्या शिक्षणाचा खरा उपयोग होईल असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
-श्रीपाल ललवाणी, पुणे.
फोटो – श्रीपाल ललवाणी आणि बाळकृष्ण लोंढे पुणे शहर शाखा यांनी अॅड. विजयसिंह ठोंबरे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा अंक दिला.



