दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ ही बेळगाव आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात गेली चाळीस वर्षे अत्यंत निष्ठेने तीस पेक्षा जास्त दर्जेदार मराठी शाळा चालवते. एन. डी.पाटील सर या संस्थेचे अध्यक्ष होते . मराठी विद्या निकेतन बेळगाव ही त्या मधली एक महत्वाची शाळा .
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा या साठी या शाळेत अनेक उपक्रम राबवले जातात .सगळ्यात महत्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन चिकित्सक बुद्धी आणि संविधानिक मूल्ये रुजावी या साठी शाळेत सातत्याने प्रयत्न केले जातात.सुभाष ओऊळकर सर ,गौरी ओऊळकर, नीला आपटे अशी सर्व मंडळी त्या साठी सतत प्रयत्नशील असतात.
या शाळेने आयोजित केलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन व्याख्यानमाले मध्ये विवेकी पालकत्व या विषयी डॉ .हमीद दाभोलकर यांची मुलाखत नीला आपटे आणि इंद्रजीत मोरे यांनी घेतली.
यावेळी डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले की, सध्याच्या कालखंडात मुलांच्या मधील मानसिक ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येतात.पालकांच्या साठी देखील हे सगळे हाताळणे आव्हानात्मक झाले आहे .मानसिक तणाव आणि चिकित्सक बुद्धी यांचा खूप जवळचा संबंध आहे .मानसिक दृष्टीने स्वतः विषयी जागरूक मुले ही अशास्त्रीय गोष्टी अंधश्रद्धा यांना बळी पडण्याची शक्यता कमी असते.लौकिक यशाच्या सोबतच शोधक बुद्धी, तटस्थपणे विचार करायची क्षमता, वंचित घटकांच्या विषयी जबाबदारीची जाणीव या गोष्टी आपल्या मुलांच्या मध्ये याव्या या साठी प्रयत्नशील राहणे देखील विवेकी पालकत्वाचा मध्ये का महत्त्वाच्या आहेत या विषयी प्रश्न उत्तरे झाली .
डॉ. हमीद दाभोलकर पुढे म्हणाले की, पालक म्हटले की बहुतांश वेळा केवळ आईच गृहीत धरली जाते पण कार्यक्रमाला बाबा लोकांची उपस्थिती देखील लक्षणीय होती.
महाराष्ट्र अंनिस चे बेळगावचे कार्यकर्ते ,बेळगाव मधले अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



