गर्भवती मातेने चंद्रग्रहण पाळणे अनावश्यक, अशास्त्रीय, त्रासदायक व धोकादायक !

इतरांना सांगा.

ग्रहण काळाविषयी आपल्याकडे जे अनेक समज पसरविले गेले आहेत, त्यांचे वैज्ञानिक विश्लेषण केले पाहिजे. कारण सर्व गरोदर महिलांना ग्रहण पाळणे सक्तीचे केले जाते. जे प्रचंड त्रासाचे , धोक्याचे व तणाव निर्माण करणारे असते. हा तणाव नाहीसा व्हावा या उद्देशाने हे लेख महत्वाचा ठरावा.

ग्रहण म्हणजे काय?-
ग्रहण म्हणजे सावल्यां पडून होणारी खगोलीय घटना असते, यावेळी कोणतीही नवीन उर्जा तयार होत नसते. सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याचे किरण चंद्रामुळे अडविले जातात व सूर्य कांहीसा किवा पूर्ण झाकला जातो. म्हणजेच चंद्राची सावली आपल्या पृथ्वीवर पडते. याउलट पृथ्वीची सावली चंद्रावर पडते तेंव्हा चंद्र कांही किंवा पूर्णपणे काळवंडतो, हे चंद्रग्रहण असते. अशारितीने सूर्य चंद्र व पृथ्वी हे समान पातळीमध्ये येतात, त्या ग्रहणा दिवशी होणारा हा सावल्यांचा खेळ असतो.

गर्भाचे व्यंग आणि ग्रहण-
दरवर्षी सरासरी 3- ४ तरी ग्रहणे होत असतात (किमान दोन व जास्तीतजास्त सात ). पृथ्वी वरून विविध भागातून ती कमी – अधिक प्रमाणात दिसतात. गरोदरपणाच्या ९ महिन्याच्या कालावधीत एका तरी ग्रहणाचा योग येत असतो. जन्मणार्या १०० बाळांपैकी १-२ बाळांना कांहीतरी व्यंग असते. त्यामुळे असे व्यंग असलेले बाळ जन्मले कि त्याचा संबध कांही तरी करून ग्रहण या घटनेबरोबर जोडला जातो. कारण तीच एक मोठी नैसर्गिक घटना लोकांना लक्षात राहिलेली असते. खरे तर ही एक मोठी गैरसमजूत आहे.

गर्भाचे व्यंग कसं निर्माण होते?
गर्भाचे व्यंग निर्माण होण्याविषयी वैद्यकीय संशोधन अलीकडच्या ६०-७० वर्षात झाले आहे. पण पूर्वीच्या काळी अशी कारणे माहित नव्हती .

जन्मजात व्यंगापैकी दुभंगलेले ओठ व टाळू आणि हात पायाचे दोष, हे तसे सामान्यपणे सहज लक्षात येणारे व अधिक प्रमाणात आढळणारे दोष असलेने त्यांचा संबध ग्रहणाबरोबर जोडला गेला.

गर्भावस्थेच्या 10 व्या आठवड्यापर्यंत म्हणजे गरोदरपणाच्या अडीच महिन्यापर्यंत बाळाचा चेहरा ओठ टाळू आणि हात पाय बोटे असे बहुतेक सर्व अवयव विकसित झालेले असतात, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. गर्भाचा हा सर्व विकास गुणसूत्रे व त्यावर असणाऱ्या जनुकांद्वारे घडवून आणला जात असतो.

गर्भाविकासशास्त्र अर्थात एम्ब्रिओलोजि ही विज्ञानाची शाखा यावर मोठा अभ्यास करीत असते. मनुष्याच्या चेहर्याचा विकास होताना ओठ व टाळू साठी देठासारखे प्रोसेसेस ६- ७ व्या आठवड्यात तयार होऊन एकमेकाकडे वाढून जुळून येऊ लागतात , या जुळण्याच्या प्रक्रियेमध्ये जनुकांचा प्रभाव महत्वाचा असतो . जर कांही कारणांमुळे एखादे जनुक सदोष असेल तर ही जुळण्याची क्रिया नीट होत नाही व दुभंगलेले ओठ / टाळू तयार होतो . १३ व्या गुणसुत्रामुळे किंवा कांही ठराविक जनुकांच्या दोषांमुळे हे घडते. कांही कुटुंबामध्ये ही सदोष जनुके वंशपरंपरेने बाळाकडे येऊन व्यंग निर्माण होते. कधीकधी ओठ टाळूच्या दोषांबरोबर हृदय व इतर अवयवांचे दोषही जोडीने अनुवंशिकतेने तयार होत असतात.

बाळाचा जसे ओठ टाळू जुळून येणे महत्वाचे असते तसेच व त्याच वेळी हात व पायांचे बोटांचे विलगीकरण होत असते. याकामी आणखी वेगळी जनुके काम करतात. जर त्यांच्यात दोष असेल तर बोटे चिकटलेली राहतात.

एकंदरीत आपण पहिले कि जनुकांच्या नियंत्रणाखाली सर्व अवयवांचा विकास होत असतो. जनुकांमध्ये दोष निर्माण होण्यास कधी अनुवंशिकता कारणीभूत असते तर कधी नव्यानेच (म्युटेशन) असे दोष असलेले जनुक तयार होते . फोलिक ऍसिड व विटामिन ब १२ अशा अन्नघटकांचा जनुकांवर परिणाम होत असतो . त्यांच्या कमतरते वा अतिरिक्तते मुळे सदोष जनुके तयार होतात. पहिल्या दोन महिन्यात आईने घेतलेल्या कांही ठराविक औषधांचा, कांही व्हायरल इन्फेक्शनचा किंवा दारू सिगारेट अशा अतिरिक्त व्यसनांचा परिणाम होत असतो.

तिसऱ्या व पाचव्या महिन्यात केलेल्या सोनोग्राफी मध्ये वरील दोष दिसतात. सोनोग्राफी करून बाळ चांगले आहे असे सांगितले असेल तर भीती बाळगण्याचे कांही कारण नसावे.

ग्रहणात बंधने पाळू नका-
गर्भवती मातेला ग्रहण पाहणे, बाहेर फिरणे , घरातील कामे करणे , खाणे पिणे झोपणे यांवर बंधनांची काहीही गरज नाही . पुढारलेल्या देशांमध्ये अशी बंधने नसतात. ग्रहण पाळण्याच्या नावाखाली महिलेला दवाखान्यात जाऊ न दिल्याने बाळाला किंवा आईला धोका झाल्याच्या घटना घडत असतात. असे घडू नये व या बंधने पाळण्याच्या जाचक त्रासातून सुटका व्हावी याच कारणासाठी समाजाची जागृती करण्यासाठी हा लेख प्रसिद्ध करीत आहे. कृपया हा लेख आपल्या परिचयातील गर्भवती मातेला आणि त्यांच्या कुटुंबीयांना पाठवून या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रबोधन मोहिमेत सहभागी व्हावे.

– डॉ.संजय निटवे (स्रीरोग तज्ज्ञ खगोलअभ्यासक)

(लेखक सांगली येथील स्रीरोग तज्ज्ञ असून खगोलशास्त्र अभ्यासक ही आहेत)

संपर्क – +91 98900 91776

इतरांना सांगा.