होळी लहान करा पोळी दान करा!

इतरांना सांगा.

महाराष्ट्र अंनिस राबवणार पर्यावरण पूरक होळी अभियान!

राज्यभारत ३ मार्च रोजी मंगळवार होळीचा सण साजरा केला जाणार आहे. होळीच्या सणा मध्ये महाराष्ट्रात अनेक ठिकाण नेवैद्य म्हणून पुरणाची पोळी होळीच्या अग्नीमध्ये टाकली जाते. एका बाजूला समजामध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषण आणि गरिबी असताना अत्यंत पौष्टिक अन्न असलेली पुरणाची पोळी हि होळी मध्ये टाकण्या ऐवजी ज्यांना पुरण पोळी मिळू शकणार नाही अशा कुटुंबाना लोकांनी पोळी दान करून होळीचा सण साजरा करावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, मिलिंद देशमुख, फारुख गवंडी, अण्णा कडलास्कर, सम्राट हटकर , प्रकाश घादगिने, मुंजाजी कांबळे, प्रवीण देशमुख , मुक्ता दाभोलकर, अशोक कदम, नंदिनी जाधव, प्रवीण देशमुख यांनी केले आहे.

अंनिसच्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हंटले आहे की, होळीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात लाकूड तोड करून लाकडे जाळली जातात .त्या मधून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होते . तसेच होळीच्या निम्मिताने वापरल्या जाणाऱ्या अपशब्दातून अनेक ठिकाणी तंटे निर्माण होतात. ह्याला पर्याय म्हणून डॉ.नरेंद्र दाभोकारांच्या कल्पक नेतृत्वातून साकारलेले पर्यावरण पूरक होळीचा उपक्रम महाराष्ट्र अंनिस गेली वीस वर्षे राज्यभर राबवत आहे. पर्यावरण पूरक होळी मध्ये लाकूड जळण्या ऐवजी आजूबाजूचा परिसर साफ करून गोळा केलेला कचरा जाळण्याचा एक पर्याय या निमित्ताने पुढे आलेला आहे. तसेच समाजातील हिंसाचार , भ्रष्टाचार , व्यसन अंधश्रद्धा ह्या वाईट प्रवृत्तींचा पुतळा करून तो जाळण्याचा देखील एक पर्याय समाजात पुढे येताना दिसत आहे.

पर्यावरण पूरक होळीला शालेय मुलांच्या मधून वाढता प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने पर्यावरण पूरक होळी साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे, त्याचेही संघटनेच्या वतीने आम्ही स्वागत करीत आहोत.

पर्यावरणाच्या वाढत्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर लोकांनी पर्यावरण पूरक होळी साजरी करून त्याला पोळी दान करण्याची जोड द्यावी असे देखील आवाहन ह्या पत्रकात करण्यात आलेले आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी या निमित्ताने महाराष्ट्र अंनिस च्या पुढाकाराने ‘होळी लहान करा, पोळी दान करा’ तसेच पर्यावरण पूरक होळी हे कार्यक्रम आयोजित केले आहेत .नागरिकांनी त्या मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर्फे करण्यात आलेले आहे.

इतरांना सांगा.