ग्रहणासंबधी अंधश्रद्धा पसरवणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी !

इतरांना सांगा.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी

तीन मार्च बुधवार रोजी या वर्षातले पहिले चंद्रग्रहण होणार आहे. ग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना असून त्याचा मानवी जीवनावर कोणताही परिणाम होत नाही. असे असताना देखील सोशल मिडिया मधून त्याच्या विषयी अनेक अतिरंजित दावे केले जात आहेत.

गर्भवती महिलांनी ग्रहण काळात एकाच जागेवर बसावे, पाणी पिऊ नये, तसेच मलमूत्र विसर्जन करू नये अशा स्वरूपाचे अवैज्ञानिक सल्ले दिले जात आहेत. तसेच ग्रहणाचा गरोदर बाईच्या पोटातील गर्भावर दुष्परिणाम होतो अशा अंधश्रद्धा देखील पसरवण्यात येत आहेत. अशा प्रकारचा सल्ला पाळल्याने तीन वर्षांच्या पूर्वी साताऱ्यात एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. राज्यातील अनेक स्त्री रोग तज्ज्ञांच्या संघटनांनी गर्भवती महिलांच्या वर ग्रहणाचा कोणताही परिणाम होत नाही, हे परत परत सांगितले आहे असे असताना देखील अनेक राष्ट्रीय वाहिन्या आणि सोशल मिडिया वर सातत्याने ग्रहण विषयी अंधश्रद्धा पसरवली जात आहे. एका बाजूला चंद्रावर यान पाठवण्याची तयारी करणारा आपला देश अजून ग्रहणाचा संबंधी अंधश्रद्धांना बळी पडतो आहे.

या पार्श्वभूमीवर ग्रहणा विषयी अंधश्रद्धा पसरवणाऱ्या व्यक्तींच्या आणि संस्थांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आज एका प्रसिद्धी पत्रकाच्या व्दारे केली आहे.

अंनिसच्या प्रसिद्धी पत्रकात पुढे नमूद केले आहे की, चंद्रग्रहण ही एक साधी खगोलीय घटना आहे. त्या मध्ये कोणतीही नवीन ऊर्जा किंवा घातक किरणे तयार होत नसतात. दर सहा महिन्यानंतर पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्या समान पातळीमध्ये आल्यानंतर होणारा सावल्यांचा हा खेळ किंवा परिणाम असतो. तरीही अन्न सेवन करणे असेल, बाहेर फिरणे असेल किंवा कोणतेही दैनंदिन व्यवहार करणे असेल उदाहरणार्थ भाजी चिरणे, कात्री वापरणे हे सर्व करीत राहण्यास कोणतीही अडचण नसते किंवा त्यांचा कोणताही दुष्परिणाम होत नसतो.

वैद्यकीय बाबींच्या संबंधाने गैरसमज आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्या गोष्टींच्या विरोधात शासनाने कठोर कार्यवाही करावी तसेच अशा गोष्टींच्या विषयी तक्रार करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कोरोना विषयी तसेच ऍलोपॅथी विषयी रामदेव बाबा यांनी केलेल्या दिशाभुल करणाऱ्या दाव्यांची बाबतीत दिला होता. ग्रहण विषयी गर्भवती महिलांच्या अनुषंगाने पसरलेल्या अवैज्ञानिक बाबी या अंतर्गत बसू शकतात. त्यामुळे शासनाने या विषयी कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत राहुल थोरात, डॉ. हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख, नंदिनीं जाधव, रामभाऊ डोंगरे, सम्राट हटकर अण्णा कडलास्कर, डॉ.अशोक कदम, मुंजाजी कांबळे, प्रकाश घादगिने, मुक्ता दाभोलकर, फारुख गवंडी, प्रवीण देशमुख यांनी केली आहे.

अंनिसने आपल्या पत्रकात पुढे असे नमूद केले आहे की, गर्भवती स्त्रीने झोपले किंवा पाय क्रॉस करून बसले किंवा चाकू कात्री वापरली असे काहीही केले तरीही गर्भावर यत्किंचितही दुष्परिणाम होत नसतो हे लक्षात घ्यावे.

सोशल मीडियावर गर्भवती महिलांच्या आरोग्य विषयी कोणतीही डॉक्टरी डिग्री नसताना सल्ला मसलत करणाऱ्या व्यक्तींच्या वरती बोगस डॉक्टर म्हणून कारवाई करावी अशी देखील यामध्ये मागणी केली आहे.

ग्रहण ही पाळण्याची नसून खगोलशास्त्रीय दृष्ट्या समजावून घेण्याची घटना आहे. त्या मुळे महाराष्ट्रात अनेक भागात महाराष्ट्र अंनिस विषयी या निमित्ताने प्रबोधन कार्यक्रम करण्यात आले आणि टेलिस्कोप मधून लोकांना ग्रहण दाखवून त्यांचे प्रबोधन करण्यात आले. तसेच सोशल मिडिया मध्ये ग्रहण विषयी गैरसमज दूर करणारी प्रबोधन मोहीम राबवण्यात आली अशी माहिती देखील या प्रसिद्धी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पत्रकात दिली आहे.

इतरांना सांगा.