अंनिस पुणे शाखेतर्फे मासिक व्याख्यानमाला मध्ये २७ जानेवारी २०२६ रोजी डॉ. गौहर रज़ा यांनी लिहिलेल्या पुस्तकाबद्दल चर्चा आयोजित करण्यात आली होती. मूळ हिंदी “मिथकों से विज्ञान तक” या हिंदी पुस्तकाचे मराठी अनुवादक विक्रम यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडणी केली आणि विविध संबंधित विषयांबद्दल संवाद साधला. मराठीत हे पुस्तक “मिथकांपासून विज्ञानापर्यंत – ब्रह्मांडाच्या विकासाची बदलती कहाणी” या नावाने अलीकडेच स्वतः डॉ. रज़ा यांनीच सेवाग्राम, वर्धा येथे प्रकाशित केले.
या पुस्तकाच्या सुरुवातीच्या दोन प्रकरणात वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय याबद्दल विवेचन करण्यात आले आहे. पुस्तकाच्या नंतरच्या भागात विविध देशांची मिथके, त्यांचे इतिहासाच्या प्रवाहात बदलते स्थान आणि त्यातून बाहेर पडून वैज्ञानिक उत्क्रांती कशी घडत गेली याबद्दल अधिक खोलात माहिती दिली आहे. पुस्तकाच्या आशयाच्या अनुषंगाने विज्ञान शिक्षण, मातृभाषेतून शिक्षण व विज्ञान विकास, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञान लेखन, विज्ञान व सामाजिक चालीरीती, परंपरा आणि मिथक यातील फरक या व इतर अनेक विषयांवर रंजक चर्चा झाली.
वैज्ञानिक जगतात सुद्धा शेकडो वर्षे मिथके, अंधश्रद्धा पाळली गेली. सोळाशे वर्ष सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हा समज कायम होता. गॅलिलिओ, केप्लर आणि कोपर्निकस यांनी आपल्या संशोधनाने आणि त्यागाने ते मिथक खोडून काढले. इंग्रजी भाषेत प्रसिद्ध होणारे संशोधन हे अधिक दर्जेदार असल्याचे मिथक सुद्धा अनेक वर्षे वैज्ञानिक जगात रुजून बसले होते त्यामुळे प्रादेशिक किंवा इतर देशांच्या भाषेत जे जे दर्जेदार वैज्ञानिक साहित्य प्रसिद्ध होत गेले त्याला कमी प्रसिद्धी आणि कमी मान्यता मिळत गेली. अनेक शास्त्रज्ञ त्यांच्या आयुष्यात दैववादी होते. त्यांनी सुद्धा एका विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीत अज्ञानाच्या आधारावर विविध मिथकांना बिलगून वेळोवेळी सैद्धांतिक मांडणी केली. काळाच्या ओघात त्यांना दुसऱ्या वैज्ञानिक, विचारवंतांनी आव्हान दिले गेले त्यामुळे वैज्ञानिक प्रगती होत गेली असे पुस्तकाच्या आधारे विक्रम यांनी समजावून सांगितले.
या पुस्तकाबद्दल विस्तृत परिचय लवकरच अंनिस वार्तापत्र मध्ये प्रसिद्ध केला जाईल.



