प्रश्न विचारणं म्हणजे देवद्रोह नाही; विचार न करणं म्हणजे आत्मद्रोह!

इतरांना सांगा.

डियर तुकोबा हे पुस्तक आधुनिक माणसाच्या प्रश्नांना संतविचारांच्या प्रकाशात पाहण्याचा प्रयत्न!

“डियर तुकोबा” हे तरुण व ताज्या दमाचे लेखक विनायक होगाडे यांचे पुस्तक मुख्यतः संत तुकाराम महाराजांशी संवाद आणि त्यांचे विचार आजच्या काळाशी जोडणारे एक रचनात्मक साहित्य आहे. हे पुस्तक तीन भागांत विभागले आहे.

पहिल्या तुकारामायण या भागात तुकाराम महाराजांची विचारधारा त्यांच्या दार्शनिक कविता/संवाद ह्याच्या सहाय्याने आजच्या गांधी, आंबेडकर, कबीर या महापुरुषांशी जोडण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे.

दुसऱ्या भागात ‘मीडिया ट्रायल ऑन तुकोबा’ या कल्पनात्मक भागात लेखक तुकारामांच्या काळात आजचा मीडिया (टि्वटर, फेसबुक, टीव्ही इ.) असता तर त्यांच्या विचारांवर कसा प्रतिक्रिया देईल, याची अतिशय मार्मिक व आकर्षक मांडणी करतो.

तिसऱ्या डियर तुकोबा या शेवटच्या भागात लेखक तुकारामांशी पत्र/संवाद करून त्यांच्या तत्त्वज्ञानाला आधुनिक तरुणाईशी जोडतो.
या तिन्ही भागांमधून तुकोबांचे आध्यात्मिक, सामाजिक आणि समकालीन जीवनाशी सम्बन्धित विचार जीवनात कसे उपयोगी पडू शकतात? हे स्पष्ट केले गेले आहे.

या पुस्तकाची वैशिष्ट्ये
सांगायची तर या पुस्तकाने तुकारामांना आजच्या वाचकां जवळ आणले आहे.
लेखकाने संत तुकारामांचे विचार सुरेख भाषेत सादर केले आहेत, ज्यामुळे आजच्या तरुणांना त्यांचा विचार सहजपणे समजतो. समकालीन दृष्टीकोनातून तुकारामांचे जीवन उलगडत मीडिया, सामाजिक परिस्थिति, विचारधारा आणि आधुनिक जीवनाशी तुकोबांच्या विचारांना जोडले आहे. त्यामुळेच हे पुस्तक प्रभावी आहे. लेखन सरळ, साध्या भाषेत आहे.

अधिकांश वाचकांच्या मते हे पुस्तक हार्डकोर धार्मिक ग्रंथापेक्षा वेगळे, मनाला भिडणारे आणि विचारप्रवर्तक आहे.
“डियर तुकोबा” हे पुस्तक तुकाराम महाराजांचे तत्त्वज्ञान आणि विचार आजच्या जगाशी जोडणारा एक प्रेरणादायी ग्रंथ आहे.

तरुण आणि संत विचार यांना जोडणारे हे पुस्तक आहे.
लेखकाने संत तुकारामांचे व्यक्तिमत्त्व एकत्रित, संवादात्मक आणि समकालीन भाषेत मांडले आहे.

पुस्तक तरुणाईला संतांची साधी, प्रभावी आणि आधुनिक जीवनाशी जुळणारी रूपे जाणून घेण्यास मदत करते.
या सगळ्यामुळे हे पुस्तक समकालीन मराठी वाचकांसाठी नक्कीच वाचण्यासारखे आहे.
या पुस्तकातील काही उद्धरणे खरोखरीच विचार करण्यासारखी आहेत. त्यापैकी काही उदाहरणादाखल देत आहोत.
१) “देव मिळवायचा असेल, तर आधी माणूस व्हावं लागतं.” या विचारातून तुकोबांची भक्ती ही कर्मकांडावर नव्हे, तर माणुसकी, करुणा आणि प्रामाणिकपणा यावर आधारित आहे, हे लेखक ठळकपणे सांगतो.
२) “देव दगडात नसतो, तो माणसाच्या वागण्यात असतो.” आधुनिक समाजातील दिखाऊ धार्मिकतेवर ही एक तीव्र, पण शांत टीका आहे. लेखक तुकोबांच्या विचारांतून आचरणप्रधान धर्म मांडतो.
३) “धर्म म्हणजे भीती नव्हे, तर विवेक.” आज धर्माच्या नावाखाली निर्माण होणाऱ्या द्वेष, अंधश्रद्धा आणि राजकारणाच्या पार्श्वभूमीवर हा विचार विशेष महत्त्वाचा ठरतो.
४) “जो माणसाला माणूस मानत नाही, त्याला देवही भेटत नाही.” जात, वर्ग, श्रीमंती–गरिबी यावर आधारित भेदाभेदांना तुकोबा स्पष्ट नकार देतात. लेखक हा विचार आजच्या समाजाशी जोडतो.
५) “आज तुकोबा असते, तर त्यांच्या अभंगांवर टीव्ही डिबेट झाली असती!”
हा उपरोधिक विचार पुस्तकाच्या वैशिष्ट्यपूर्ण भागातून येतो. सोशल मीडिया, टीआरपी, ट्रोलिंग यांचा संतांवर काय परिणाम झाला असता याचा लेखक कल्पक वेध घेतो.
६) “तुकोबा म्हणजे पळून जाण्याचा अध्यात्म नाही, तर उभं राहून जगण्याचं बळ आहे.” संतविचार म्हणजे संन्यास नव्हे, तर जबाबदार आणि सजग जीवन जगण्याची प्रेरणा—हा संदेश लेखक अधोरेखित करतो.
७) “प्रश्न विचारणं म्हणजे देवद्रोह नाही; विचार न करणं म्हणजे आत्मद्रोह.”

अंधश्रद्धेला नकार देणारा आणि विवेकाला प्रोत्साहन देणारा हा विचार पुस्तकाचा आत्मा आहे. ही उद्धरणे व विचार वाचताना जाणवतं की
“डियर तुकोबा” हे केवळ संतचरित्र नाही,
तर आधुनिक माणसाच्या प्रश्नांना संतविचारांच्या प्रकाशात पाहण्याचा प्रयत्न आहे.

पुस्तक: डियर तुकोबा (Dear Tukoba)
लेखक: विनायक होगाडे
प्रकाशन: मधुश्री पब्लिकेशन, पुणे
भाषा: मराठी
पृष्ठसंख्या: 169 पृष्ठे
किंमत –

परिचय – रमेश साळुंखे,
अंनिस कार्यकर्ते, नवी मुंबई

इतरांना सांगा.