तरुणांई भारावली सोलापूर अंनिसच्या चमत्कार सादरीकरण कार्यक्रमाने

इतरांना सांगा.

बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर येथील ग्लोबल व्हिलेज स्कूलच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) शिबिरासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सोलापूर शाखेच्या वतीने शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी विज्ञान आणि चमत्कार जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

एनएसएस शिबिरातील स्वयंसेवकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, अंधश्रद्धांबाबत जागृती घडवून आणणे व विवेकनिष्ठ विचारसरणी रुजविणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शहर शाखा सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. उमाकांत चनशेट्टी, उपाध्यक्ष आण्णा दीक्षित, कार्याध्यक्ष रामलिंग गायकवाड, सचिव सुजित हावळे तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते ब्रह्मानंद धडके, उषा शहा, निशा भोसले, शीला हवळे, शकुंतला सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आरतीने झाली, जी अंधश्रद्धा नष्ट करण्याची प्रेरणा देते.

अंनिस कार्यकर्त्या नीशा भोसले यांनी पाण्याने दिवा लावून दाखवला, मंत्राद्वारे होम पेटवण्याचे वैज्ञानिक कारण सांगितले तसेच अंधश्रद्धेतून लोखंडी लंगर तोडण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक केले. उषा शहा यांनी कुंकूवाचा बुक्का तयार करण्याचे वैज्ञानिक कारण स्पष्ट केले, नारळातून बांगडी, फुले व हळद-कुंकू काढून दाखवले तसेच नजर काढताना पाण्यातून साखर काढण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. ब्रह्मानंद धडके यांनी तांब्याच्या कळसातून वेगवेगळ्या नद्यांचे पाणी काढून दाखवले, प्रश्नचिन्हाचा बॅलन्स कसा साधायचा याचे वैज्ञानिक स्पष्टीकरण दिले. हवेतून चेन काढण्याचे प्रात्यक्षिक केले तसेच हाताच्या बोटातून विद्यार्थ्यांना स्पर्श करून गोड चव कशी येते हे दाखवले.

अंनिस कार्याध्यक्ष रामलिंग गायकवाड यांनी बक्षी हिप्परगा गावातील सर्व महिला, पुरुष व विद्यार्थ्यांचे आभार मानले आणि अंधश्रद्धा नष्ट करण्याचा संकल्प घेतला. गावातील लहान-थोर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सोलापूर शाखा
इतरांना सांगा.