विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांना स्नेहालय ही सामाजिक संस्था गेल्या 30 वर्षांपासून विविध पुरस्कारांनी गौरवीत आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन, विवेकवादी विचारांचा प्रसार व वैज्ञानिक दृष्टिकोन समाजात रुजविण्यासाठी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पायाभूत काम केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. गावोगाव बुवाबाजी, हातचलाखीचे चमत्कार, चेटूक, अघोरी मंत्र तंत्र, महिलांसह समाजाची आर्थिक शारीरिक मानसिक फसवणूक आणि शोषण चव्हाट्यावर आणले. जन्मजात जाती प्रथा आणि जातपंचायतीच्या विरोधात प्रथमच त्यांनी आवाज उठवला. जादूटोणाविरोधी कायदा महाराष्ट्रात संमत करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. समाजातील प्रतिगामी प्रवृत्तींनी त्यांची याबद्दल हत्या केली.
नरेंद्र दाभोलकर यांचे कार्य ज्या कार्यकर्त्यांनी समर्पित वृत्तीने पुढे चालू ठेवले त्यापैकीच अहिल्यानगर जिल्ह्यात डॉ. दाभोलकर यांच्या क्रांतिकारक विचारांची ज्योत प्रज्वलित ठेवून त्यांचे कार्य पुढे चालू ठेवल्याबद्दल मधुकर अनाप यांच्या या योगदानाची दखल पुरस्कार निवड समितीने घेतल्याचे स्नेहालय कडून कळविण्यात आले.
सोलापूर चे ज्येष्ठ गांधीवादी नेते विलासभाई शहा यांच्या प्रायोजनातून व प्रेरणेतून हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. सन 2025 26 चा शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन पुरस्कार अहिल्यानगर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष मधुकर अनाप यांना मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला.
आदर्श गाव हिवरे बाजारचे प्रणेते पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते व स्नेहालयाचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी, ओरिसा येथील सामाजिक कार्यकर्ते मधुसूदन दास, सौ. देव जानी दास, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष केतन शहा, वंचित व दुर्बल घटकांच्या विकासासाठी कार्य करणारे वामन बावळे यांचे प्रमुख उपस्थितीत नुकताच स्नेहालय अहिल्यानगर येथे
रुपये ११०००/- रोख, सन्मानपत्र व पुस्तक देऊन प्रदान करण्यात आला.
मधुकर अनाप हे गेली 35 वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. गेल्या तीन वर्षापासून जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार तसेच जादूटोणाविरोधी कायदा विषयी प्रबोधन जिल्ह्यातील अनेक शाळा व महाविद्यालय आणि सामाजिक स्तरावर सातत्याने करत आहे.
भूत ,भानामती, करणी ,बुवाबाजी च्या अनेक केसेस स्वतः हाताळल्या आहेत.
पर्यावरण पूरक सण आणि उत्सव याविषयी शाळा महाविद्यालयात अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम घेत आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे सहकार्याने स्थापन केले आहेत.जिल्ह्यात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे संघटना बांधणीसाठी शाखा स्थापन करून चळवळीच्या कार्याचा विस्तार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत समितीचे प्रकाशन असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांचा प्रचार आणि प्रसार अहिल्या नगर जिल्ह्यात करून पुस्तकांचे लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत केले.मागील वर्षात डॉ.नरेंद्र दाभोलकर यांची नवीन प्रकाशित 35 पुस्तके तसेच डॉ. तारा भवाळकर, माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या अंनिस मार्फत प्रकाशनाच्या हजारो पुस्तकांच्या प्रति समाजातील सर्व स्तरापर्यंत प्रचार आणि प्रसार करून पोहोचविले आहेत.
चळवळीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र वार्षिक अंकासाठी जाहिरातदार व देणगीदार मिळविणे आणि वार्तापत्र चे वर्गणीदार करण्यात दरवर्षी सक्रिय सहभागाबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे चार वेळा राज्यस्तरीय शतकवीर पुरस्कार, तीन वेळा राज्यस्तरीय आधारस्तंभ पुरस्कार,डॉ.नरेंद्र दाभोलकर राज्यस्तरीय ग्रंथ मित्र पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच लातूर जिल्हा शाखेच्या वतीने नुकताच अहिल्यानगर आधारस्तंभ पुरस्कार लातूर येथे राज्यकार्यकारिणी शिबिरात देण्यात आला.
शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे विचार कार्य पुढे घेऊन जाणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल स्नेहालय परिवाराने घेतल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, गणेश चिंचोले, प्रवीण देशमुख, मुक्ता दाभोलकर, राहुल थोरात, मिलिंद देशमुख, रामभाऊ डोंगरे, प्रशांत पोतदार, चंद्रकांत उळेकर, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी संस्थेला धन्यवाद देऊन मधुकर अनाप यांचे अभिनंदन केले आहे.



