तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्रात महिला प्रशिक्षणार्थीसाठी अंनिसचे व्याख्यान
प्रतिनिधी –
महिला या अंधश्रद्धेच्या बळी आणि वाहक ही आहेत. समाजाने शेकडो प्रथा परंपरा पाळण्याचे बंधन त्यांच्यावर लादले आहे. अंधश्रद्धेमुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यांना मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणारा जादूटोणाविरोधी कायदा महाराष्ट्र शासनाने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर २०१३ साली लागू केला आहे. या कायद्यातील अनेक कलमे ही महिलांना अंधश्रद्धेच्या जोखडातून मुक्त करणारी आहेत. महिलांचे अंधश्रद्धेतून जे शोषण होते ते थांबवणारा हा कायदा आहे असे प्रतिपादन अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी व्यक्त केले. ते काल तुरची (तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात महिला गृहरक्षक प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणात बोलत होते.
अंनिस कार्यकर्ते राहुल थोरात पुढे म्हणाले की, आजपर्यंत जादूटोणाविरोधी कायद्यानुसार महिलांचे शोषण करणाऱ्या शेकडो बुवा बाबांवर कारवाई झाली आहे.
तथाकथित दैवीशक्तीने पुत्रप्राप्तीचे अमिष दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करणे हा जादूटोणाविरोधी कायद्यानुसार दंडनीय अपराध आहे.
एखाद्या महिलेला अपशकुनी मानून ती काळी जादू करते, करणी करते असा आरोप करुन ती चेटकीण आहे अशी बदनामी करणे, शारीरिक हिंसा करणे या सर्व बाबी या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा आहेत. जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली तर महिलांच्या मानवाधिकाराची जपवणूक होईल, असे मत अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी व्यक्त केले.
यावेळी अंनिस कार्यकर्ते नानासो पिसे, सर्जेराव पाटील, अमर खोत, प्रा. वासुदेव गुरव यांनी मंत्राने अग्नी पेटवणे, जिभेतून तार आरपार करणे इत्यादी चमत्कारांचे प्रयोग करून दाखवले.
पोलिस निरीक्षक हिंमत माने स्वागत यांनी केले. पोलीस उपनिरीक्षक सोनाली झेंडे यांनी सुत्रसंचलन केले. या प्रशिक्षणास राज्यभरातील ८०० गृहरक्षकदल महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या.



