पश्चिम बंगालमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणे हीच खरी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना कृतिशील आदरांजली
– मनीष राय चौधरी, बंगाल युक्तीवादी समितीचे कार्यकर्ते
ज्या धडाडी, धाडस आणि कार्यक्षमतेने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून कार्य केले, त्याच धडाडी, धाडस आणि कार्यक्षमतेने जेष्ठ बुद्धिवादी कार्यकर्ते प्रबीर घोष यांनी पश्चिम बंगालमध्ये भारतीय विज्ञान व युक्तिवादी समितीच्या माध्यमातून कार्य केले आहे. ‘भारतीय विज्ञान ओ युक्तिबादी समिती’ ज्याला बंगालमध्ये संक्षिप्तपणे ‘युक्तिबादी समिती’ म्हणून पण ओळखले जाते. अशा या पश्चिम बंगालमधील अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणार्या युक्तीवादी समितीचे जनरल सेक्रेटरी मनीष रॉय चौधरी यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात आणि फारूक गवंडी यांनी केलेली बातचीत..
आपण युक्तिबादी समितीमध्ये कसे आलात?
मनीष रॉय चौधरी – माझा जन्म १९८५ मध्ये पश्चिम बंगालमधील बेलूर मठात झाला. माझे वडीलच नव्हे तर त्यांच्या आधीच्या दोन पिढ्यांपूर्वी कुटुंबातील अनेक सदस्य शिक्षक होते. परिणामी, मी शैक्षणिक वातावरणात जन्मलो आणि वाढलो. बेलूर मठ परिसरात वाढल्यामुळे, मी लहानपणापासूनच रामकृष्ण आणि स्वामी विवेकानंदांच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक प्रभावाने वेढलेला होतो. माझे कुटुंब धार्मिक होते, परंतु रूढीवादी किंवा कट्टर नव्हते. यामुळे मला धर्माबद्दल प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य मिळाले, जरी समाधानकारक उत्तरे नेहमीच मिळत नव्हती. अर्थात, त्या वेळी नास्तिकवाद कधीच शक्य नव्हता.
“तसं आमचं घर मध्यमवर्गीय. खाऊन-पिऊन सुखी. माझे वडील शिक्षक तर चुलते डाव्या चळवळीत काम करणारे. आमच्या कुटुंबाची देव नाकारण्याची विद्रोही परंपरा जुनीच. मलाही कुणी धार्मिक बाबतीत कसलाही आग्रह धरलेला नसायचा. या मोकळ्या वातावरणाचा मला पुढील आयुष्यात फायदाच झाला. मला वाचण्याची सवय होती.
घराशेजारच्या बेलूर मठातील वाचनालयात मला ‘अलौकिक ना लौकिक’ हे पुस्तक सापडले. सहज म्हणून वाचण्यास घेतले आणि संपूर्ण पुस्तक वाचूनच ते खाली ठेवले. या पुस्तकाचे लेखक प्रबीर घोष यांना भेटण्याची इच्छा झाली. ते कोलकात्यामध्ये डमडम येथे राहात असल्याचे कळाले. त्यांच्या घरी रविवार आणि बुधवारी स्टडी सर्कल होत असल्याचे कळाले. मी एकदा जाऊन त्यांना भेटलो. ती तारीख देखील मला आजही आठवते. २५ डिसेंबर २००७. काही स्मृती या न विसरण्यासाठीच असतात. त्यातलीच ही एक माझी स्मृती आहे. मग सुरू झाली चर्चा, वाद-संवाद. प्रत्यक्षात त्यांच्यासोबत बुवा-बाबांचा भांडाफोड करणेसाठी जाणे इ. मार्गाने मी कायमस्वरूपी प्रबीर घोष यांच्या युक्तिवादी समितीशी जोडलो गेलो. मोठ्या भावासाठी बंगालमध्ये आदराने ‘दादा’ हा शब्द जोडला जातो. म्हणून आम्ही प्रबीर घोष यांना ‘प्रबीरदा’ म्हणू लागलो.”
प्रबीर घोष यांच्या बुद्धिवादी विचारांचा प्रभाव आपल्यावर कसा आहे?
मनीष रॉय चौधरी – मी प्रबीर घोष यांच्या सहवासात,अभ्यास वर्ग, वादविवाद आणि चर्चांमधून खूप काही शिकलो. धर्म, अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेपासून राजकारणापर्यंत. मी गर्दीसमोर स्टेजवर बोलणे, माध्यमांना मुलाखती देणे शिकलो. आज बंगाली, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांना आणि ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ सारख्या परदेशी वृत्तपत्रांना मुलाखती देण्याची माझ्याकडे जी काही क्षमता आहे – त्याचे श्रेय पूर्णपणे प्रबीर घोष यांना जाते.
प्रबीरदा यांनी आम्हाला अंधश्रद्धाविरोधी, चमत्कार विरोधी जाहीर कार्यक्रम ‘अलौकिक नोय लौकिक ‘म्हणजे सार्वजनिक प्रेक्षकांसमोर काहीही अलौकिक नाही हे कसे करायचे हे शिकवले. विविध वर्तमानपत्रे आणि मासिकांसाठी लेख लिहिण्यापासून ते असोसिएशनच्या पुस्तकांचे प्रूफरीडिंग करणे आणि अखेर असोसिएशनच्या मासिकाचे संपादक होणे हे सर्व त्यांच्यामुळेच शक्य झाले.
२०१५-१६ पासून, त्यांच्या सूचनेनुसार, मी भारतीय विज्ञान ओ युक्तिवादी समिती (भारतीय विज्ञान आणि बुद्धिवादी संघटना) चे सरचिटणीस म्हणून काम करत आहे.
आपला युक्तिवादी समितीतील कामाचा सहभाग कसा आहे?
मनीष रॉय चौधरी – गेल्या १८ वर्षांत, माझे लेख विविध वर्तमानपत्रे आणि जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. आतापर्यंत, माझी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. माझी पत्नी साबित्री रायचौधरी यांच्या मदतीने, मी सध्या बुद्धिवाद आणि वैज्ञानिक स्वभावाला प्रोत्साहन देण्यासाठी लघु अॅनिमेशन चित्रपट बनवत आहे, ज्याद्वारे आम्हाला भारतातील भावी पिढीच्या मुलांच्या मनातून अंधश्रद्धा दूर करण्याची आशा आहे.
आपल्या युक्तिबादी समितीच्या माध्यमातून बुवाबाजीचा भांडाफोड केलेल्या केसेसची माहिती सांगा.
मनीष रॉय चौधरी – “तशा केसेस तर खूप आहेत. पण काही वैशिष्ट्यपूर्ण केसेस आपण जाणून घेऊ शकतो.
पाद्री सेरिलोला आव्हान – “पोपनंतरचा सर्वांत लोकप्रिय, प्रभावशाली ख्रिश्चन धार्मिक नेता मॉरिस सेरिलो, सर्व देश जिंकून शेवटी कोलकात्यात बुडून गेला! अविश्वसनीय! हा चमत्कारच असावा!” हे शब्द आहेत रॉबर्ट ईगलचे. रॉबर्ट हा चॅनल फोरचा लोकप्रिय दिग्दर्शक-निर्माता आहे. रॉबर्ट पुढे असेही म्हणाला, “तुम्ही किती छान काम केले आहे याची तुम्ही कल्पना करू शकत नाही.” हे सर्व कौतुक होते युक्तिबादीच्या प्रबीर घोष यांच्यासाठी. त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून कामच तसे केले होते.
ऑक्टोबर १९९२ साली मॉरिस सेरिलो नावाचा चमत्कार करणारा पाद्री कोलकात्यामध्ये आला. ‘हले हुईया’ म्हणून प्रचंड मोठ्या गर्दीत त्याने चमत्कार सुरू केला. पांगळे चालू लागले. बहिरे ऐकू लागले. मुके बोलू लागले आणि अचानक प्रबीरदा यांनी समोर उभे असणार्या पोलीस कमिशनरच्या हातामधून माईक हिसकावून घेऊन ‘आमचं चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान स्वीकारा”, असे त्या बाबाला ठणकावून सांगितले. तुम्हाला इतकं कळते तर दुर्गादेवीला हात किती हे सांगा? म्हणून माईकवरून प्रबीरदा यांनी थेट आव्हान दिले. त्याचबरोबर प्रेक्षकांमध्ये असणार्या युक्तिबादी कार्यकर्त्यांनी पत्रके उधळण्यास आणि आव्हान स्वीकारा म्हणून घोषणाबाजीस सुरुवात केली. या सगळ्या गोंधळामध्ये कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. जगभर फिरून आलेल्या मॉरिस सेरिलोला कोलकात्यातून अक्षरश: पळून जावे लागले आणि त्याची नोंद वर सांगितल्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय मिडियाकडून घेतली गेली. याचे कारण पण तसेच होते. प्रबीर घोष यांनी फक्त ५० कार्यकर्त्यांना घेऊन ४० हजारांच्या जमावासमोर केलेलं प्रचंड धाडस, अचूक नियोजन, गोपनीयता आणि अभ्यास यातून त्यांनी एका मोठ्या पाद्रीला आव्हान दिले होते.
संतती मंत्र देणारा हुजूर सैदाबादी-
हुजूर सैदाबादी हे बांगलादेशातील लोकप्रिय सूफी संत. बांगलादेशातील वर्तमानपत्रे आणि मासिकांनी चाळीस वर्षांच्या या चमत्कारिक बाबाच्या बातम्या भरपूर छापल्या आहेत. भक्तांना आकर्षित करण्यासाठी हुजूर कधीकधी कोलकात्याला येत असत. आता त्यांच्या आगमनाचा संदेश सर्वांपर्यंत पत्राद्वारे पोहोचवणे शक्य नव्हते, म्हणून हुजूर ते कोलकात्याला कधी असतील, कुठे असतील आणि कधी भेट देतील, त्यांच्या फोटोसह वर्तमानपत्रात जाहिरात देत असत. तो सहसा ग्रँट स्ट्रीटवरील मोठ्या हॉटेलमध्ये राहत असत.
हुजूर सैदाबादी यांचे पूर्ण नाव बरेच मोठे आहे- ‘अलहाज हुजूर दिवाण मोहम्मद सदुर रहमान चिती सैदाबादी.’ थोडक्यात हुजूर सैदाबादी. प्रचंड श्रीमंती थाट. सरकारी मदतीमुळे कोट्यवधीचे मालक. बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या सोबत यांचे संबंध. जाईल तिथे गुंडांचे संरक्षण.गुजरात मधील पार्वती माँ सारखे निपुत्रिकांना संतान देण्याचा याचा धंदा. कोलकातामधील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये गुंडांच्या सोबतीने राहणारा आणि दुवा देऊन निपुत्रिकांना संतान देणारा हा बाबा. फेब्रुवारी १९९१ मध्ये कोलकात्याच्या एका लोकप्रिय वृत्तपत्रात जाहिरात देऊन ते कोलकात्यात आले. प्रबीरदा याच्या गुहेमध्ये धाडसाने आपल्या पत्नीसह गेले आणि त्याला आव्हान देऊन त्याचा भांडाफोड केला. त्याकाळी हे प्रकरण वर्तमानपत्रामध्ये खूप गाजले. हुजुर सैदाबादीला कोलकात्त्यातून आपला गाशा गुंडाळावा लागला.
ज्योतिषी सत्यानंदचा भांडाफोड –
आचार्य सत्यानंद, स्वतःचे विमान, स्वतःचे विमानतळ, स्वतःचे टीव्ही चॅनल असणारा, अमर्यादित संपत्तीचा मालक. हायप्रोफाईल ज्योतिषी. प्रबीर घोष काही कार्यकर्ते, आपला मुलगा पिनाकी, सून सोनालीसोबत नॅशनल जिओग्राफिकचे पत्रकार फ्रेंच रोबोट यांना घेऊन सत्यानंदच्या दरबारात शिरले. सोबत असणार्या मुलीला मंगळ दोष असल्याचे सांगून उपचार करण्यास सांगितले. त्यांना काही प्रश्न विचारून ही सगळी बातचीत कॅमेर्यामध्ये रेकॉर्ड केली. परंतु सत्यानंदला शंका आल्याने त्याच्या गुंडांनी सर्व कॅमेरे फोडून टाकले. कार्यकर्त्यांना मारहाण केली. आणि आपल्या चॅनलवरून सत्यानंदनी भक्तांना चिथावणी दिली. “प्रबीर घोष जैसे लोग हिंदू धर्म, सनातन धर्म विरोधी है| वो जहाँ मिले, पीट पीट कर मार डालो|” तरीही प्रबीरदा यांनी निर्भीडपणे या बाबाचा भांडाफोड केला.
अंधश्रद्धा आणि चमत्कार या विरोधात आमच्या संघटनेचे ५० लाख रुपयांचे आव्हान अजूनही कायम आहे आणि आजपर्यंत कोणीही ते जिंकू शकलेले नाही.
आम्ही अनेक बुवा बाबांचा भांडाफोड करतो पण त्यांच्यावर प्रभावी पोलिसी कारवाई होण्यासाठी महाराष्ट्रासारखा बंगालमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा अस्तित्वात नाही.
आपल्या संघटनेच्या भविष्यातील योजना काय आहेत?
पश्चिम बंगालमधील इतर विज्ञान संघटनांशी जवळचा संपर्क स्थापित करणे आणि विज्ञान चळवळीला सामान्य लोकांच्या जवळ नेणे ही सर्वात महत्त्वाची भविष्यातील योजना आहे. इतर राज्यांमधील विज्ञान संघटनांशी संपर्क वाढवण्याचे कामही सुरू आहे. सध्या आमचे ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’, पंजाबमधील ‘तर्कशील सोसायटी’, आसाममधील ‘विज्ञानमानस्का यात्रा’, त्रिपुरामधील ‘त्रिपुरा युक्तिवाद विकास मंच’ या संघटनांशी घनिष्ठ संबंध आहेत.
आमचे सर्वात महत्त्वाचे ध्येय म्हणजे पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्राच्या धर्तीवर शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या प्रेरणादायी विचाराने अंधश्रद्धा निर्मूलन आणि जादूटोणाविरोधी कायद्यासाठी एक शक्तिशाली जनआंदोलन सुरू करणे.
पश्चिम बंगालमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करणे हीच खरी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि प्रबीर घोष यांना कृतिशील आदरांजली ठरेल. या कायद्यासाठी आम्ही डाव्या विचारांच्या आमदारांना भेटून त्यांना कायदा सभागृहात मांडण्यासाठी निवेदन देत आहे. मागील वर्षी आम्ही डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनी 20 ऑगस्ट रोजी कायदा मागणी परिषद ही घेतली होती.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या नावांचा मला पुरस्कार मिळतोय त्यातून या कामाला मला मोठी ऊर्जा मिळेल. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचे मी आणि माझी संघटना मनपूर्वक आभारी आहे.
मला आशा आहे की सर्वांच्या सहकार्याने आम्ही या बुद्धिवादी चळवळीला समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत घेऊन जाऊ शकू.
- मनीष राय चौधरी,
बेलूर मठ, कोलकत्ता, पश्चिम बंगाल.
संपर्क – 81008 14180
संवादक – राहुल थोरात, फारुख गवंडी, सांगली संपर्क – 9422411862


