समाज माध्यमे आणि ए आय

इतरांना सांगा.

आजच्या डिजिटल युगात मानवी जीवनात ज्या तंत्रज्ञानाने सर्वात मोठा बदल घडवला आहे, त्यामध्ये स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागतो. एकेकाळी संवादासाठी पत्रे, नंतर टेलिफोन आणि मग संगणक यांचा वापर होत होता. परंतु आज हातात असलेला स्मार्टफोन म्हणजे जणू एक संपूर्ण जगच आपल्या तळहातात आले आहे. जगाच्या एका टोकावर असलेली व्यक्ती काही सेकंदात दुसऱ्या टोकावरील व्यक्तीशी बोलू शकते, व्हिडिओ पाहू शकते, विचारांची देवाणघेवाण करू शकते. त्यामुळे भौगोलिक अंतर जणू संपल्यासारखे वाटते. आज अनेकांना असे वाटते की सोशल मीडियामुळे दूरचे लोकही जवळ आले आहेत. अनेक वर्षांपूर्वी तुटलेले संबंध पुन्हा जुळले, जुन्या मित्रांशी संपर्क झाला, नातेवाईकांशी संवाद वाढला. वरकरणी पाहता हे सर्व अत्यंत सकारात्मक आणि मानवी जीवनाला समृद्ध करणारे वाटते. परंतु या आभासी जवळीकीच्या मागे काही गंभीर मानसिक, सामाजिक आणि राजकीय प्रश्न निर्माण होत आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणाई समाज माध्यमे आणि एआयच्या विळख्यात अडकली आहे. म्हणून आज गंभीरपणे विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आजचा माणूस सतत कोणाशीतरी जोडलेला असतो. पण हा जोडलेपणा प्रत्यक्ष नसून आभासी असतो. एका व्यक्तीसाठी दिवसातील अनेक तास सोशल मीडियावर घालवणे अगदी सामान्य झाले आहे. सकाळी उठताच सर्वप्रथम मोबाईल हातात घेते, रात्री झोपेपर्यंत त्याच्याशी जोडलेली राहते. दरम्यानच्या काळात फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब किंवा इतर अनेक माध्यमांवर सतत संवाद, प्रतिक्रिया, फोटो, व्हिडिओ आणि रील्स यांचा वर्षाव होत असतो. त्यामुळे त्या व्यक्तीला असे वाटते की ती एकटी नाही. तिच्याभोवती सतत लोक आहेत, संवाद आहे, करमणूक आहे. या आभासी जगातून एकटेपणाची भावना जणू नाहीशी झाल्यागत वाटते. रिकामा वेळ भरून काढला जातो. अनेकांना तर प्रत्यक्ष भेटीगाठींची गरजही कमी वाटू लागते.

यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आज अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर जे व्हिडिओ, रील्स किंवा पोस्ट आपल्याला दिसतात त्या निव्वळ योगायोगाने दिसत नाहीत. त्या मागे अत्यंत गुंतागुंतीचे अल्गोरिदम कार्यरत असतात. हे अल्गोरिदम आपल्या आवडी, निवडी, प्रतिक्रिया, आपण कोणते व्हिडिओ किती वेळ पाहतो, कोणत्या विषयांवर टिप्पणी करतो, कोणत्या पोस्ट शेअर करतो या सर्व माहितीचे विश्लेषण करतात. या सर्व माहितीवर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला त्याच प्रकारची अधिकाधिक सामग्री दाखवू लागते. त्यामुळे व्यक्तीला असे वाटते की ही सामग्री जणू तिच्यासाठीच तयार केली आहे. परिणामी ती अधिकाधिक वेळ त्या माध्यमांवर घालवते. यामुळे एक प्रकारची सतत चालणारी करमणूक निर्माण होते. माणसाला कंटाळा येण्याची शक्यता कमी होते. परंतु या सततच्या करमणुकीमुळे एक वेगळा मानसिक परिणामही होत असतो. जेव्हा व्यक्ती काही काळासाठी मोबाईल बाजूला ठेवते, तेव्हा अचानक एक प्रकारची पोकळी जाणवू लागते. काही लोकांना बेचैनी, चिडचिड, अस्वस्थता वाटू लागते. कारण मेंदू सतत उत्तेजनांच्या सवयीचा गुलाम झालेला असतो. सोशल मीडियावरील प्रत्येक सूचना, प्रत्येक नवीन व्हिडिओ, प्रत्येक प्रतिक्रिया ही मेंदूला तात्पुरता का होईना पण आनंद देणारी ठरते. मानसशास्त्रज्ञांच्या मते, या प्रक्रियेत मेंदूमध्ये डोपामिन नावाच्या रसायनाची निर्मिती होते. हेच रसायन आनंद, उत्साह आणि अपेक्षा निर्माण करते. त्यामुळे व्यक्ती पुन्हा पुन्हा मोबाईलकडे आकर्षित होत राहते.

परंतु या आभासी जगात एक मूलभूत गोष्ट नसते, ती म्हणजे प्रत्यक्ष मानवी सहवासाची अनुभूती. जेव्हा दोन व्यक्ती प्रत्यक्ष भेटतात, तेव्हा त्यांच्या संवादात केवळ शब्द नसतात. त्यामध्ये चेहऱ्यावरील भाव, आवाजातील चढउतार, स्पर्श, हसू, शरीरभाषा आणि वातावरण यांचा मोठा वाटा असतो. मानवी मेंदू पंचेंद्रियांद्वारे अनुभव घेण्यासाठी तयार झालेला आहे. रंग, वास, चव, स्वर आणि स्पर्श या सर्व माध्यमांतून मेंदूला आनंदाची अनुभूती मिळते. प्रत्यक्ष संवादात या सर्व गोष्टींचा समावेश असतो. पण आभासी संवादात यापैकी बहुतेक गोष्टी अनुपस्थित असतात. त्यामुळे जरी वरकरणी व्यक्ती अनेक लोकांशी जोडलेली असली तरी तिच्या मेंदूला अपेक्षित असलेली भावनिक आणि संवेदनात्मक पूर्तता होत नाही. याचा परिणाम विशेषतः लहान मुले आणि तरुणांवर अधिक दिसून येत आहे. आज अनेक मुले बालपणापासूनच मोबाईल आणि टॅबलेटच्या सहवासात वाढत आहेत. त्यांचे खेळ, संवाद, मनोरंजन यापैकी मोठा भाग डिजिटल माध्यमांवर आधारित आहे. त्यामुळे प्रत्यक्ष मित्रांबरोबर खेळणे, भांडणे, पुन्हा जुळवून घेणे, एकत्र काम करणे, सामूहिक निर्णय घेणे अशा सामाजिक कौशल्यांची निर्मिती कमी प्रमाणात होत आहे. अनेक तरुणांमध्ये एकलकोंडेपणा वाढताना दिसतो. ते ऑनलाइन जगात सक्रिय असतात, पण प्रत्यक्ष संवाद करतांना मात्र अस्वस्थ असतात. याचाच एक परिणाम म्हणजे समूहभावनेचा ऱ्हास. समाज हा मूलत: समूहावर आधारित असतो. माणूस सामाजिक प्राणी आहे, हे तत्त्व केवळ तात्त्विक नाही तर जैविक आहे. मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात समूहात राहणे ही जगण्याची गरज होती. समूहामुळे संरक्षण, सहकार्य आणि ज्ञानाची देवाणघेवाण शक्य झाली. पण डिजिटल माध्यमांमध्ये संवादाचे स्वरूप वेगळे झाले आहे. येथे प्रत्यक्ष जबाबदारी नसते, समोरच्या व्यक्तीचा भावनिक अनुभव जाणवत नाही. त्या व्यक्तीच्या शब्दांवरून आपण बरेचदा त्या व्यक्तीला जोखतो. त्यामुळे अनेकदा लोक लहानसहान मतभेदांवरून एकमेकांवर तुटून पडतात. ट्रोलिंग, अपमान, खोटी माहिती पसरवणे, समूहाने एखाद्या व्यक्तीवर हल्ला करणे अशा विकृती वाढताना दिसतात.

या प्रक्रियेच्या मागे केवळ मानसशास्त्रीय कारणे नसून आर्थिक आणि राजकीय घटकही आहेत. आज बहुतेक सोशल मीडिया कंपन्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे वापरकर्त्यांचा डेटा गोळा करणे. हा डेटा म्हणजे व्यक्तीची सवयी, आवडी, विचार, भीती, राजकीय भूमिका, आर्थिक स्थिती याबद्दलची माहिती असते. या माहितीचा वापर जाहिरातींसाठी, बाजारपेठेतील धोरणांसाठी आणि कधी कधी राजकीय प्रचारासाठीही केला जातो. त्यामुळे वापरकर्त्यांना जास्तीत जास्त वेळ या माध्यमांवर गुंतवून ठेवणे हे या कंपन्यांचे प्रमुख उद्दिष्ट असते. यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अत्यंत आकर्षक, भावनिक आणि उत्तेजक सामग्री तयार केली जाते. यामुळे एक प्रकारे माहितीचे बुडबुडे तयार होतात. व्यक्तीला तिच्या विचारांशी जुळणारीच माहिती अधिकाधिक दिसू लागते. वेगळे विचार, वेगळे दृष्टिकोन यापासून ती दूर राहते. परिणामी समाजात ध्रुवीकरण वाढते. लोक आपल्या मतांच्या बाबतीत अधिक कट्टर ब
होतात. संवादाऐवजी संघर्ष वाढतो. आज जगातील अनेक देशांमध्ये राजकीय ध्रुवीकरण वाढण्यामागे सोशल मीडियाचा मोठा वाटा असल्याचे अनेक संशोधनांनी दाखवून दिले आहे. या परिस्थितीत प्रश्न असा उभा राहतो की या सगळ्यातून मार्ग काय? काही लोक असा सल्ला देतात की सोशल मीडिया पूर्णपणे बंद करावा, मोबाईलचा वापर कमी करावा. परंतु हा उपाय व्यवहार्य नाही. कारण आजच्या जगात डिजिटल तंत्रज्ञान पूर्णपणे टाळणे शक्य नाही. शिक्षण, व्यवसाय, संवाद, माहिती यासाठी त्याचा उपयोग आवश्यक आहे. त्यामुळे प्रश्न तंत्रज्ञानाचा नसून त्याच्या वापरण्याच्या पद्धतीचा आहे.

सर्वप्रथम आपल्याला या सर्व गोष्टींकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे. आपल्याला काय दाखवले जाते, कोणत्या प्रकारची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आणि त्यामागे कोणते आर्थिक किंवा राजकीय हितसंबंध असू शकतात याचा विचार करणे आवश्यक आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक माहिती सत्य असतेच असे नाही. त्यामुळे विवेकाने माहितीचे परीक्षण करणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिजिटल आणि प्रत्यक्ष जीवन यामध्ये संतुलन राखणे. माणसाला प्रत्यक्ष संवादाची गरज असते. कुटुंबीयांबरोबर वेळ घालवणे, मित्रांबरोबर भेटणे, सामूहिक उपक्रमांमध्ये सहभागी होणे, निसर्गात वेळ घालवणे या गोष्टी मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. विशेषतः लहान मुलांसाठी प्रत्यक्ष खेळ, वाचन, कला, संगीत अशा क्रियाकलापांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तिसरी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाचा समाजकल्याणासाठी वापर करण्याची जाणीव निर्माण करणे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे अत्यंत शक्तिशाली तंत्रज्ञान आहे. त्याचा उपयोग वैद्यकीय संशोधन, शिक्षण, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रांत होऊ शकतो. परंतु जर त्याचा वापर केवळ नफेखोरीसाठी आणि लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी केला गेला, तर त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतील. त्यामुळे समाजाने आणि शासनानेही या तंत्रज्ञानाच्या वापराबाबत जबाबदारीने धोरणे तयार करणे आवश्यक आहे.

या संदर्भात मध्यम मार्गाचा विचार महत्त्वाचा ठरतो. अतिरेकी नकार किंवा अतिरेकी स्वीकार या दोन्ही टोकांच्या भूमिका योग्य नाहीत. तंत्रज्ञान पूर्णपणे नाकारणे हे अवास्तव आहे, तर त्याला पूर्णपणे शरण जाणे हेही धोकादायक आहे. म्हणून विवेकपूर्ण वापर हा एकमेव शाश्वत मार्ग ठरतो.
इतिहासात अनेक तत्त्वज्ञांनी मानवी जीवनात संतुलन आणि सजगतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. मानवी भावनांचा अतिरेक टाळणे, विवेकाने निर्णय घेणे आणि जागरूकपणे जगणे या तत्त्वांवर अनेक तत्त्वज्ञान परंपरा आधारित आहेत. आजच्या डिजिटल युगातही हीच तत्त्वे लागू होतात. तंत्रज्ञानाचा उपयोग करायचा, पण त्याचे गुलाम व्हायचे नाही. माहिती घ्यायची, पण विवेक हरवायचा नाही. तंत्रज्ञानाद्वारे करमणूक करून घ्यायची, पण वास्तवाशी नाते तोडायचे नाही. शेवटी प्रश्न केवळ सोशल मीडिया किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा नाही, तर प्रश्न आहे मानवी सजगतेचा. तंत्रज्ञान हे साधन आहे; त्याचा उपयोग कसा केला जातो हे माणसानेच ठरवायचे असते. जर माणूस विचारपूर्वक, जबाबदारीने आणि समाजहिताच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर करेल, तर ते मानवी प्रगतीचे शक्तिशाली साधन ठरू शकते. पण जर माणूस अंधपणे त्याच्या आहारी गेला, तर तेच तंत्रज्ञान समाजाला मानसिक, सामाजिक आणि राजकीय संकटांकडे नेऊ शकते. म्हणूनच आजच्या काळात सर्वात महत्त्वाची गरज आहे ती विवेकाची, सजगतेची आणि संतुलित जीवनदृष्टीची. डिजिटल जगात वावरताना आपल्या मानवी मूल्यांचे भान राखणे, प्रत्यक्ष मानवी नात्यांचे महत्त्व जपणे आणि तंत्रज्ञानाचा उपयोग समाजकल्याणासाठी करण्याचा प्रयत्न करणे हेच या समस्येवर दीर्घकालीन उपाय ठरू शकतात. अशी सजग वृत्ती विकसित झाली तर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सोशल मीडिया हे मानवाला गुलाम बनवणारे साधन न राहता मानवी प्रगतीचे शक्तिशाली माध्यम ठरू शकतील.

जगदीश काबरे
(jetjagdish@gmail.com)

इतरांना सांगा.