सातारा, 11 एप्रिल 2026: ‘सत्य सर्वांचे आधी घर’ हा अखंड लिहिणाऱ्या महात्मा जोतिबा फुले यांच्या 199 व्या जयंती व द्विशतक महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सातारा शाखेच्या वतीने अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र या मासिकाच्या ‘महात्मा फुले स्मृती विशेषांक’ प्रकाशन सोहळा अखंड गायनाने संपन्न झाला.
परिवर्तन संस्था, सातारा येथील अंनिसच्या व्यसनमुक्ती केंद्रात हा कार्यक्रम पार पडला. म.अं.नि.स.च्या राज्य अध्यक्षा व माजी प्राचार्या प्रा. प्रमोदिनी मंडपे यांच्या हस्ते आणि राज्य कार्यकारिणी सदस्य शंकरराव कणसे यांच्या अध्यक्षतेखाली ‘अंनिस वार्तापत्र जोतिबा फुले विशेषांका’चे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी प्रा. मंडपे यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. मुलींचे शिक्षण, बालविवाह, केशवपन रूढी, अस्पृश्यता निवारण तसेच हंटर आयोगाला लिहिलेले पत्र अशा विविध घटनांचा सविस्तर उहापोह त्यांनी केला.
अध्यक्षीय भाषणात शंकरराव कणसे यांनी आंतरजातीय विवाह व ‘सेफ हाऊस’ संकल्पनेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “भिन्न जातीत लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्या जोडप्यांसाठी सुरक्षित निवारा म्हणजे सेफ हाऊस. हरियाणा, पंजाब राज्यात असे निवारे सरकारी आहेत. महाराष्ट्रातील पहिले सेफ हाऊस महा.अं.नि.स.ने सुरू केले आहे. आतापर्यंत 18 जोडपी तेथे राहून गेली असून रहिमतपूर व सातारा येथील कार्यकर्त्यांनी 27 आंतरजातीय लग्ने लावली आहेत.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. दीपक माने यांनी केले. मान्यवरांचा परिचय राज्य सहकार्यवाह उदय चव्हाण यांनी करून दिला तर आभार सातारा शाखा अध्यक्ष विजय पवार यांनी मानले.यावेळी वार्तापत्र जिल्हा अध्यक्ष प्रकाश खटावकर,दिलीप महादार,शाखा कार्याध्यक्ष संतोष भिलारकर,राज्य सहकार्यवाह भगवान रणदिवे आणि स्टाफ मेंबर उपस्थित होते.


