महिला दिनानिमित्त अंनिस पुणे जिल्ह्यातर्फे विविध उपक्रम

इतरांना सांगा.

८ मार्च रोजी झालेल्या जागतिक महिला दिनानिमित्त पुणे जिल्ह्यातर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले.स्त्री ही अंधश्रद्धेची बळी तर आहेच पण वाहकही आहे, ही समितीची भूमिका आहे.म्हणून स्त्रियांचे अंधश्रद्धे विरोधी प्रबोधन करणे अत्यंत गरजेचे आहे असे समिती मानते.

दि. ३ मार्च रोजी चंद्रग्रहण झाले.ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे पण ग्रहणाविषयी लोकांच्या मनात प्रचंड अंधश्रद्धा आहेत. ग्रहणाच्या काळात गरोदर महिलांनी बाहेर पडू नये,भाजी चिरू नये, काही खाऊ नये अशा अनेक अंधश्रद्धा आढळतात.या पार्श्वभूमीवर नांदेड सिटी येथील एक महिला चांदणी प्रफुल्ल थोरात यांनी या सर्व अंधश्रद्धांना फाटा देत ग्रहण काळात भाजी चिरली, स्वयंपाक केला,इतर नियमित कामे केली व त्या बाहेरही पडल्या. त्यांच्या या धारिष्ट्याचे कौतुक पुणे शहर शाखेतर्फे त्यांना ग्रंथ भेट देऊन करण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या,” आमचे घर पुरोगामी विचारांचे असून अंधश्रद्धा न मानणारे आहे.माझे दीर राहुल थोरात यांच्या प्रेरणेतून मी ही कृती केली.त्यास सर्व कुटुंबीयांनी पाठिंबा दिला.अनेक टी.व्ही. चॅनेल वाल्यांनी या बातमीला प्रसिद्धी दिली.अनेक मित्रमंडळी आणि नातेवाईकांचे कौतुक करणारे फोन आले. काही लोकांनी ट्रोलही केले याचे वाईट वाटले. माझी ही साधी कृती एवढी व्हायरल होईल असे वाटले नव्हते.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी येऊन माझे जे कौतुक केले आणि पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे.” यावेळी पुणे शहर शाखेचे अध्यक्षा अनुराधा काळे, मिलिंद देशमुख, श्रीपाल ललवाणी, वसंत कदम, राम नलावडे,बाळकृष्ण लोंढे हे कार्यकर्ते उपस्थित होते.

८ मार्च रोजी ज्येष्ठ कार्यकर्ते व ग्रंथ दिंडीचे संचालक विश्वास पेंडसे यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये ‘शेंद्री’ या लघुपटातील,अनेक पुरस्कार प्राप्त अभिनेत्री अलका कोळपे मांगले यांची मुलाखत घेण्यात आली.ज्येष्ठ अभिनेत्री इला पवार यांनी ही मुलाखत घेतली. यामध्ये अलका मांगले यांनी आपला अभिनय क्षेत्रातील प्रवास कसा झाला याविषयी रोचक शैलीत माहिती दिली व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आभार मानले.याच कार्यक्रमात मिळून साऱ्याजणी या मासिकाच्या महिला विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मासिकाच्या संपादिका गीताली वि. म. यांनी महिलांवर होणाऱ्या अन्यायासंबंधी उहापोह केला. स्त्रीच स्त्रीची शत्रू असते हा जाणीवपूर्वक पसरवलेला गैरसमज आहे. त्यात काही तथ्य नाही असे त्या म्हणाल्या. फक्त जागतिक महिला दिन साजरा करून उपयोग नाही तर स्त्रियांना समानतेची वागणूक दिली पाहिजे,त्यांना आपापल्या क्षेत्रात भरीव कार्य करण्यासाठी कुटुंबाने मदत केली पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.अध्यक्ष स्थानी विजय मोरे होते.
८ मार्चच्या महिला दिनाचे औचित्य साधून पुणे शहर शाखेतर्फे कोथरूड पोलीस स्टेशन येथील महिला कॉन्स्टेबल यांचा पेढा,गुलाब पुष्प व डॉ. दाभोलकर यांचे पुस्तक, शहर अध्यक्षा अनुराधा काळे यांच्या हस्ते देऊन सन्मान करण्यात आला. अशाप्रकारे आमच्या कामाची दखल यापूर्वी कोणी घेतले नव्हती,आम्ही अंधश्रद्धा निर्मूल समितीचे आभारी आहोत,अशा भावना या महिला पोलिसांनी व्यक्त केल्या.या उपक्रमात ऍड शीला परुळेकर,वसंत कदम, अनिल वेल्हाळ, प्रकाश भारद्वाज,बाळकृष्ण लोंढे,प्रकाश सोनवणे, संजय मालती कमलाकर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
अशा प्रकारे विविध उपक्रमाद्वारे महिलांचे प्रबोधन करणारे कार्यक्रम राबविण्यात आले.

  • श्रीपाल ललवाणी
    9823977472

इतरांना सांगा.