- सुभाष बापू पाटील यांचे प्रतिपादन
- अंनिस राज्य कार्यकारणी बैठकीचा समारोप
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दोन दिवशीय राज्य कार्यकारिणी बैठक सातारा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या बैठकीच्या समारोपाचे प्रमुख पाहुणे आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नातू एडवोकेट सुभाष पाटील म्हणाले की,
“चार्वाक ते नरेंद्र दाभोलकर असा अंधश्रद्धा निर्मूलनाचा मोठा वारसा भारताला आणि महाराष्ट्राला आहे. परंतु हा वारसा सध्या धोक्यात आलेला आहे. क्रांतीसिंह नाना पाटील हे देखील सत्यशोधकी विचारांचे होते त्यांचा हा सत्यशोधकी वारसा चालवण्याचा प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलन समिती अतिशय चिकाटीने निर्भयपणे करीत आहे हे अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय बाब आहे.
सुभाष पाटील पुढे म्हणाले की,आपल्या दैनंदिन आयुष्यात हा अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार जपणे हे अत्यंत महत्त्वाचे असून कार्यकर्ते ते काम निष्ठेने करीत आहेत.
यावेळी अंनिसच्या राज्य अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्राचार्या प्रमोदिनी मंडपे यांचा पहिला सत्कार सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
या दोन दिवशी राज्य कार्यकारणी मध्ये मागील सहा महिन्याच्या कामाचा आढावा आणि पुढे सहा महिने करावयाच्या कामाचे संघटनात्मक नियोजन करण्यात आले.
अंनिस राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये महत्त्वाचे पाच झालेले निर्णय पुढीलप्रमाणे..
१. महाराष्ट्रभर जिल्हावार कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे घेणे.
२. ऑगस्ट 2026 मध्ये पुणे येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्यस्तरीय अधिवेशन घेणे.
३. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा महिला विभाग, युवा विभाग आणि सोशल मीडिया विभाग येत्या सहा महिन्यात प्रभावीपणे कार्यान्वित करणे.
४. नरेंद्र दाभोलकर लोक विद्यापीठाव्दारे मुलांसाठी नवीन अभ्यासक्रम तयार करणे आणि या अभ्यासक्रमासाठी जास्तीत जास्त मुलांना बसवणे.
५. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राची वर्गणी एप्रिल २०२६ पासून रुपये तीनशे वरून रुपये 400 करणे. येत्या वर्षभरात प्रकाशन विभागाच्या वतीने 50 पुस्तिकांचे प्रकाशन करणे.
समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्ता दाभोलकर यांनी केले. तर सूत्रसंचालन फारूक गवंडी यांनी केले. कार्यक्रमास डॉ. शैला दाभोलकर, गणेश चिंचोले, दिपक गिरमे, अरविंद पाखले, सुकुमार मंडपे उपस्थित होते.



